Site icon Money Tech News

कृष्णा…

 

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

 

दुर्गा भागवत

Exit mobile version