कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का ?Gauri Sthapna

गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही येणार. या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजे गौरींचा मान Gauri Sthapna ! हा गौरींचा उत्सव तसेच पूजा, विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. हा सृजनाचा उत्सव असल्याने तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो. विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे, उभ्या मूर्ती, भिंतीवरील चित्र, तेरड्याच्या रोपट्याला देवीचे चित्र लावून, कलश इत्यादी स्वरूपात पुजल्या जातात.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मात्र देवीचे प्रतीकात्मक रूप म्हणून ७ खडे आणून पुजले जातात. या संबंधात केले जाणारे विविध विनोदही ऐकायला मिळतात. पण याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. सगळीकडचे जलसाठे तुडुंब भरलेले असतात. हे जलसाठे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात. फोफावलेल्या वनस्पती, वेली, निसरडी जमीन, सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते. अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी, तिन्ही सांजेला उजेड कमी होताना, खूप झाडीच्या ठिकाणी कांहींचा अनपेक्षित अपमृत्यु ओढवतो. अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत, ओढ्यात, धबधब्यात, समुद्रात बुडून मरण्याचे प्रमाण वाढते. मग यातून भीतीची, दंतकथांची परंपरा सुरु होते. कांही कथा तर खूपच भीतीदायक आहेत. अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या कांही स्त्रियांची पिशाच्चे येथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते. त्यांच्या कहाण्या, कथा अनेक पिढ्यांपर्यंत सांगितल्या जात राहतात. त्यामुळे विविध प्रकारचे विधी, तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात.

Gauri Sthapna

 

मोक्षदायी अशी सप्त तीर्थे, सप्त मातृका, सात पवित्र नद्या तशी आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानलेले आहे. त्यांना सात जल योगिनी, जलदेवता, अप्सरा म्हणतात. त्याचे साती आसरा, सती आसरा असे अपभ्रंशही झाले. कांहीं समाजात त्यांना गुरुकन्या मानले जाते. मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे जलचरांची आहेत. त्यांना त्रास दिल्यामुळे, नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो. म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यामध्ये नेतात अशी लोकांची श्रद्धा आहे. तसा कोप होऊ नये म्हणून प्रतीकात्मक ७ खडे आणून त्यांची पूजा केली जाते. हे खडे जल साठ्याजवळून, वाहत्या पाण्यातून, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणांहून आणले जातात. त्यांना समृद्धी देणाऱ्या, रक्षणकर्त्या सप्त देवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरींच्या परंपरागत कहाणीमध्ये, दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला, वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेल्या गौरी देवीने वाचविले व त्याला समृद्धी दिली, असे वर्णन आहे.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये या सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. या गौरी आणतांना व विसर्जन करतांना मौन धारण केले जाते. हे विसर्जनही जलसाठे, वाहते पाणी, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणी केले जाते. कोकणात सहज उपलब्ध असलेले पदार्थ म्हणजे तांदूळ आणि नारळ ! म्हणूनच गौरीसाठी पक्वान्न म्हणून तांदुळाचे घावन आणि नारळाच्या दुधात गूळ, केशर, वेलची घालून बनविलेले घाटले केले जाते. कोकणातील अन्य ब्राह्मण पोट जाती तसेच अन्य जातींमध्ये सुद्धा खड्यांच्या गौरी आणण्याची पद्धत आहे. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत. कांही कुटुंबांमध्ये, खड्यांच्या गौरी आणण्याचा नवस बोलला जातो. इच्छापूर्तीनंतर कायमच अशा प्रकारे गौरी आणल्या जातात असे दिसते.

Also Read : थोडं काहीतरी वेगळं…..

“ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते।”.. असा श्लोक खड्याच्या गौरी आणताना म्हणतात. ही सात खड्यांच्या सात देवींची नावे नसून, एकाच जेष्ठा गौरीची ही सर्व विशेषणे आहेत

आनंदाच्या सणासुदीच्या काळात ( म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात ) माणसाने आपण देवापेक्षाही ( निसर्गापेक्षाही ) शक्तिवान, बुद्धिवान आहोत असे समजून आपला जीव घालविण्यापेक्षा, त्याचा सन्मान राखावा हेच या ७ खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे.

Read Marathi News Here

©( हा लेख व फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत )
** *मकरंद करंदीकर
makarandsk@gmail.com

Leave a Comment